कोल्हार/ प्रतिनिधी ः
साखर कारखान्यातून साखर घेऊन निघालेल्या ट्रकचा डिझेल टँक पेट्रोल पंपावर फुटल्याने ट्रकने पेट घेतला. यामध्ये साखर पोते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ट्रकचेही मोठे नुकसान झाले. पेट्रोल पंपापासून अगदी पाच-सात फुटांवर ट्रक पेटूनही सुदैवाने विपरीत घटना टळली.
ही दुर्घटना नगर-मनमाड रस्त्यावरील कोल्हार येथील रिलायन्स पेट्रोल पंप वर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. कर्जत तालुक्यातील अंबालिका सहकारी साखर कारखान्यातून कोपरगाव येथील गायत्री ट्रान्सपोर्टचा ट्रक (क्रमांक एम. पी. 14. जी. बी. 1477) मध्यप्रदेश येथे सुमारे 25 टन साखरेचे पोते घेऊन निघाला होता. राहाता तालुक्यातील कोल्हार येथे डिझेल भरण्यासाठी हा ट्रक रिलायन्स पंपावर थांबला. पंपापासून अवघ्या काही फुटांवर ट्रकचा डिझेल टँक फुटला. टायर गरम असल्याने ट्रकने अचानक पेट घेतला.
रिलायन्स पंपावरील कामगार व स्थानिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. अवघ्या काही मिनिटात विखे पाटील कारखान्याचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. सोबत कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे व कामगारांनी आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. अर्ध्या तासात सर्व आग आटोक्यात आली. परंतु तोपर्यंत ट्रक बराचसा जळून मोठे नुकसान झाले. ट्रक मधील काही साखर पोते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
पेट्रोल पंपसमोरच पेटला ट्रक डिझेल टाकी फुटल्याने घडला प्रकार