खामगाव- पुरोगामी विचारांचा वारसा जोपासणाऱ्या महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांपासून लेक वाचवा लेक शिकवाची मुहूर्तमेढ रोवली असताना गेल्या काही महिन्यांपासून महिलांवरील व बलिकांवरील अत्याचार दिवसागणिक वाढतच आहे, परिणामी हे अत्याचार साधुसंतांच्या महाराष्ट्र भूमीला न शोभणारे नसून पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील व पिंपळगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम हिवरा खुर्द येथे घडला.
नात्याने स्वतः चा बाप असलेला नराधम अंकुश किसनराव बघे हा स्वतः च्या मुलीवर गेल्या एक वर्षांपासून सातत्याने लैंगिक शोषण करीत अत्याचार करीत असल्याचे बिंग (दि.22 फेब्रुवारी) रोजी फुटले. बापाच्या सततच्या अत्याचाराने हैराण व त्रस्त झालेल्या 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेने अखेर पिंपळगाव राजा पोलिस ठाणे गाठून झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती ठाणेदार सचिन चव्हाण यांच्यासमोर कथन केली, त्यामुळे सचिन चव्हाण यांनी तपासाची गती वाढवून सदर अत्याचाराला बळी पडलेल्या बलिकेला न्याय मिळवून देण्यासाठी आपली तपासचक्रे फिरवली व आरोपी बाप अंकुश बघे यास अखेर बेड्या ठोकल्या.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राम हिवरा खुर्द येथे नातेवाईकांकडे गेल्या महिनाभरापासून राहत असलेल्या अंकुश बघे (वय 45 रा.रामटेक ता.मुर्तिजापूर जि.अकोला) ह्याने स्वतःच्या 16 वर्षीय अल्पवयीन बलिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद या बालिकेने 22 फेब्रुवारीला पोलिसांत दिली. यावरून सचिन चव्हाण यांनी त्या बलिकेचा जवाब नोंदवून घेतला असता सदर बालिका गेल्या आठ दिवसांपासून हिवरा खुर्द येथे राहत असतांना आरोपी नराधम बापाने माझ्यासोबत दुष्कर्म केले, यामुळे मी प्रतिकार केला असता मला व माझ्या आईला ठार मारण्याच्या धमक्या आरोपी बापाने दिल्या असल्याचे तिने सांगितले. बालिका पारस येथे गेल्या एक वर्षांपासून भाड्याच्या खोलीत राहत असताना या नराधमाने तेथे सुद्धा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला,त्यामुळे अत्याचार सहन न करू शकल्याने सदर बालिकेने पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात आपली फिर्याद दाखल केली.या फिर्यादी ची दखल घेत ठाणेदार चव्हाण यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत हिवरा खुर्द गाठून आरोपीला ताब्यात घेतले.
मुलीच्या फिर्यादीवरून पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात कलम 354,376 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या आरोपीला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन चव्हाण,पो.कॉ संतोष डागोर,पो.कॉ विनोद भोजने हे करीत आहेत.