फुलराणी जग सोडून गेली; अतिदक्षता कक्षातील झुंज अखेर ठरली व्यर्थ, फुलराणीवर दारोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

नागपूर : हिंगणघाटच्या फुलराणीचा संघर्ष अखेर सोमवारी थांबला. शोकाकुल वातावरणात सायंकाळी पाच वाजता तिच्यावर दारोडा या तिच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या सात दिवसांपासून ४० टक्के जळालेल्या फुलराणीवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी अखेर मृत्यूने तिला गाठले.


अतिदक्षता कक्षातील झुंज अखेर ठरली व्यर्थ


फुलराणीची प्रकृती अगदी सुरुवातीपासूनच चिंताजनक होती. रविवारी रात्री साडेदहानंतर फुलराणीच्या प्रकृतीत गंभीर चढ-उतार सुरू झाले. ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात डॉक्टर्स आणि परिचारिकांचे चिंताक्रांत पथक तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करीत होते. वैद्यकीय पथकाचा रात्रभर चाललेला आठ तासांचा संघर्ष सोमवारची सकाळ उजाडताच निष्फळ ठरल्याचे स्पष्ट झाले. साडेसहाला फुलराणीला दुसरा हार्ट अटॅक आला. दहा-पंधरा मिनिटांतच ईसीजी मॉनिटरवर ब्लँक लाइन झळकली. आपण ही लढाई हरलो असल्याची जाणीव डॉक्टरांना झाली. फुलराणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपुष्टात आली होती.


फुलराणीवर उपचार करणाऱ्या पथकातील बर्न सर्जन डॉ. दर्शन रेवणवार यांनी या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती ‘दिव्य मराठी’ला दिली. रविवारी सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान फुलराणीवर बर्न ड्रेसिंगची शस्त्रक्रिया करण्यात आली. दिवसभर तिच्या प्रकृतीत फारसे कुठलेही चढ-उतार जाणवले नाहीत. रात्री साडेदहा वाजता डॉ. दर्शन रेवणवार यांना फुलराणीच्या शरीरातील प्राणवायूचा स्तर कमी होत असल्याचा निरोप मिळाला. त्या वेळी इतर डॉक्टरांचा चमू कामाला लागला होता. व्हेंटिलेटरचे सेटिंग वाढवले गेले. सर्वसामान्य परिस्थितीत ४० टक्क्यांवर ठेवले जाणारे व्हेंटिलेटरचे सेटिंग हळूहळू १०० टक्क्यांवरही गेले. त्याच वेळी डॉक्टरांच्या चमूला गांभीर्याची पूर्ण कल्पना आलेली होती. रक्तदाब सातत्याने कमी-जास्त होत होता. रात्री ११ ते ३ या कालावधीत तिला ह्रदयाचे ठोके तसेच प्राणवायूचा पुरवठा वाढवण्यासाठी ३० ते ४० इंजेक्शन्स दिली गेली. पहाटे चार वाजता फुलराणीला पहिला हार्ट अटॅक आला. डॉक्टर आणि परिचारिकांनी ितला कार्डियाक मसाज व काही इंजेक्शन्स दिली. तासाभराच्या या प्रयत्नानंतर फुलराणीची प्रकृती बऱ्यापैकी स्थिर होत असल्याचे संकेत मिळाल्याने डॉक्टरांच्या पथकाने सुटकेचा नि:श्वास टाकला, असे डॉ. रेवणवार यांनी नमूद केले. त्या वेळी फुलराणीचे वडील, आजोबा व अन्य काही नातेवाइकांना अतिदक्षता विभागात आणून तिची प्रकृती दाखवण्यात आली. फुलराणीने वैद्यकीय पथकाला क्षणभराचीही उसंत दिली नाही. रात्रभर अतिदक्षता विभागात झालेल्या धावपळीने सारेच प्रचंड थकलेले होते. साऱ्या परिचारिकादेखील दमलेल्या होत्या. त्यामुळे सकाळ उजाडल्यावर काही जण चहा घेण्यासाठी निघण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी साडेसहा वाजता फुलराणीला दुसरा हार्ट अटॅक आला. तिला पुन्हा कार्डियाक मसाज आणि काही इंजेक्शन्स दिली गेली. पण, या वेळी फुलराणीकडून या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत नव्हता. पावणेसात वाजेच्या सुमारास ईसीजी मॉनिटरवर ब्लँक लाइन झळकली. त्याच वेळी सारे काही संपले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तब्बल दहा मिनिटे आवश्यक तपासण्या, चाचण्या पार पडल्या. ६ वाजून ५५ मिनिटांनी फुलराणीचा मृत्यू जाहीर करण्यात आला, असे डॉ. रेवणवार यांनी सांगितले.


आश्वासनानंतर मृतदेह स्वीकारला


फुलराणीचा मृत्यू झाल्यापासून एकही मंत्री भेटायला तसेच विचारपूस करायला आला नाही. त्यामुळे संतप्त वडील व नातेवाइकांनी सरकारकडून न्यायाची हमी मिळेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असे जाहीर केले. वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी फुलराणीच्या वडिलांचे बोलणे करून दिले. “न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू. तसेच फुलराणीच्या घरातील एकाला सरकारी नोकरी देऊ, ‘ असे आश्वासन देशमुख यांनी दिले. त्यानंतर मृतदेह न स्वीकारण्याचा निर्णय मागे घेतला.


आरोपीला जनतेसमोर जाळा


निर्भया प्रकरणातील आरोपींची फाशी वारंवार टळत आहे. आमच्या मुलीच्या प्रकरणातील आरोपीबाबत असे कदापि होता कामा नये. एक तर ताबडताेब न्याय द्या, नाही तर त्यालाही मुलगी जळाली त्याच ठिकाणी पेट्रोल टाकून जाळा. आरोपीला जनतेसमोर जाळा. त्याशिवाय त्याला वेदना कळणार नाही. ३ फेब्रुवारीपासून माझी मुलगी माझ्याशी बोलली नाही. माझ्याशी न बोलताच ती गेली. मला सहानुभूती आणि देखावा नको तर न्याय हवा. मंत्र्यांनी न्याय मिळेपर्यंत आमच्यासोबत राहावे. - फुलराणीचे वडील


त्याला दयामाया नाही, फासावर लटकवू :


“आरोपीला कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करू. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरू असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं याबाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करून आरोपीला फासावर लटकवू.” -उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री


त्यालाही तिच्यासारखेच पेट्रोल टाकून जिवंत जाळा : फुलराणीच्या आईचा हंबरडा ऐकून दगडी भिंतीही थरारल्या


फुलराणीच्या मृत्यूची खबर तिच्या आईला देण्यात आली नव्हती. त्यांना आॅरेंज सिटी हाॅस्पिटलसमोरच्या निवासी वसतिगृहात ठेवण्यात आले होते. फुलराणीचे मामा हेमराज भालेकर, नातेवाईक अॅड. किशोर राम लांबट, सास्ताबादचे सरपंच धर्मपाल रेवतकर यांनी ती बातमी तिच्या आईला सांगितली. ते ऐकून आई संगीता पिसुड्डे यांनी हंबरडा फोडला. सारे वातावरण हेलावून गेले. खोलीच्या दगडी भिंतीचाही थरकाप उडाला. रडता रडता संगीता यांनी वडील देविदास कोल्हे यांच्या खांद्यावर मान टाकीत हुंदके दिले.’नराधमाने माझ्या मुलीला जिथे जाळले त्याच ठिकाणी त्यालाही पेट्रोल टाकून जाळा. त्याशिवाय त्याला वेदना कळणार नाही,’ असा टाहो संगीता यांनी फोडला. शेवटी वडिलांनी त्यांना शांत केले.


त्यालाही तिच्यासारखेच पेट्रोल टाकून जिवंत जाळा : फुलराणीच्या आईचा हंबरडा ऐकून दगडी भिंतीही थरारल्या


फुलराणीच्या मृत्यूची खबर तिच्या आईला देण्यात आली नव्हती. त्यांना आॅरेंज सिटी हाॅस्पिटलसमोरच्या निवासी वसतिगृहात ठेवण्यात आले होते. फुलराणीचे मामा हेमराज भालेकर, नातेवाईक अॅड. किशोर राम लांबट, सास्ताबादचे सरपंच धर्मपाल रेवतकर यांनी ती बातमी तिच्या आईला सांगितली. ते ऐकून आई संगीता पिसुड्डे यांनी हंबरडा फोडला. सारे वातावरण हेलावून गेले. खोलीच्या दगडी भिंतीचाही थरकाप उडाला. रडता रडता संगीता यांनी वडील देविदास कोल्हे यांच्या खांद्यावर मान टाकीत हुंदके दिले.’नराधमाने माझ्या मुलीला जिथे जाळले त्याच ठिकाणी त्यालाही पेट्रोल टाकून जाळा. त्याशिवाय त्याला वेदना कळणार नाही,’ असा टाहो संगीता यांनी फोडला. शेवटी वडिलांनी त्यांना शांत केले.